Share

मुंबईतील शिवसेना आमदाराचा अचानक मृत्यू; राजकीय वर्तूळात खळबळ

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

माहितीनुसार, आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं. आमदार रमेश लटके यांचं पार्थिक मुंबईत आणण्यासाठी तयारी सुरू असून लवकरच त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे.

लटके हे 1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून गेले.

त्यानंतर पुढच्याच 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष असलेले रमेश लटके यांनी आपल्या विभागातील लोकांवर छाप पाडायला सुरुवात केली. त्यांची लोकप्रियता वाढू लागली

नंतर शिवसेनेने त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना नगरसेवकपदासाठीची उमेदवारी दिली. दांडगा लोकसंपर्क आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील एक उमदं नेतृत्व म्हणून आमदार लटके यांना ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट केले. लिहिले, ‘शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल ऐकून धक्का बसला. काही महिन्यांपूर्वीच आंगणेवाडीच्या जत्रेला जाताना कोकणात जाणाऱ्या विमानात त्यांची भेट झाली होती. डायएटींगच्या माध्यमातून त्यांनी वजन कमी केल्याबद्दल मी त्यांचं कौतुक केलं होतं. पक्षापलीकडे जाऊन ते एक चांगले मित्र होते. हे सारं अविश्वनीय आहे’

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लिहिले, ‘शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!लटके परिवार व शिवसैनिकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now