एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह बंड केलं आणि भाजपशी युती केली. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेला गळती लागली. आमदारांसह अनेक शिवसेना खासदार देखील शिंदे गटात जाऊ लागले.
शिवसेनेवर आलेल्या या परिस्थितीमुळे शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काही कट्टर शिवसैनिकांबरोबर करू लागेल आहेत. नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यांनी महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढली आहे.
काल आदित्य ठाकरे संवाद यात्रेदरम्यान शिर्डीला होते. यावेळी, शिवसेनेच्या एका मुस्लीम मावळ्यानं स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र आदित्य ठाकरेंना दिलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यानं या पत्रात म्हटलं आहे.
मुस्लीम कार्यकर्त्यानं उचललेल्या या पावलामुळं लोक भावुक झाले आहेत. सध्या त्याने लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील टोप येथील सुरज विलास पाटील या शिवसैनिकानंही स्वत:च्या रक्तानं पत्र लिहून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि नंतर शिर्डीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या या ठिकाणच्या दौऱ्याची सांगता केली. आदित्य ठाकरेंनी याआधी औरंगाबाद येथे आपला दौरा केला होता, तेव्हा त्यांना शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांचा रोड शो झाला. यावेळी बिडकीन परिसरात शिवसैनिकांमध्ये कमालीचे चैतन्य संचारल्याचे दिसले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील ही सर्वात मोठी गर्दी असल्याची चर्चा आहे. शिवसैनिकांनी इमारतीच्या वरती पावसात भिजत आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं होतं.