पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी भाजप नेते डॉ सुब्रमण्यम स्वामी आता चांगलेच तयारीला लागले आहेत. विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
सुब्रमण्यम स्वामी यांनी वारकरी संप्रदायातील महाराजांची नुकतीच भेट घेतली आहे. माहितीनुसार, पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी ते लवकरच पंढरपूरलाही भेट देणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांची कायदेतज्ज्ञांची टीम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिराबरोबरच सर्व हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ते पावलं उचलत आहेत. विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल ३५ कोटींच्या आसपास असते. इथे दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असल्याने हे देवस्थान ताब्यात घेण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ लागते.
सध्या समिती अध्यक्षपद रिक्त असून सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे कार्यभार आहे. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरातील प्रमुख वाऱ्या या ठिकाणी बहरतात. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महत्त्व आहे.
फडणवीस सरकारच्या काळात या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते. सुब्रमण्यम स्वामी यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय नेते यासोबतच त्यांची सनातन धर्माचे प्रचारक म्हणून ओळख आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून काम केलं आहे. स्वामी यांनी भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. चंद्रशेखर सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.






