शिवसेनेचे जेष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३५ आमदारांसोबत पक्षाविरोधात बंड करत मोठं पाऊल उचललं आहे. सध्या आमदारांसह एकनाथ शिंदे सुरत येथे असून भाजपशी वाटाघाटी करत असल्याचं समजत आहे. अशात आणखी काही आमदार मुंबईतून सुरतला रवाना होणार असल्याची माहिती आली, त्यामुळे शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट सुरत गाठलं. सध्या ते सूरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. याठिकाणी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास १३ आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यातच आणखी काही आमदार मुंबईतून सुरतला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती.
मुंबईतून काही आमदार सुरताना जाणार ही माहिती समोर आल्यानंतर शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या. सध्या शिवसेनेकडून या आमदारांना मुंबईतच रोखून धरले जात आहे. या आमदारांत दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर आणि अंबादास दानवे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
हे सर्वजण सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. हे सर्व आमदार सकाळपासून नॉट रिचेबल होते. मात्र, यापैकी काही आमदार मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती शिवसेनेला लागली. त्यानंतर या आमदारांना सुरतला जाण्यापासून रोखण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकणारे जे तीन आमदार होते, ते हॉटेल सेंट रेगिसमध्ये असल्याचे समजताच शिवसैनिक आणि काही आमदार तातडीने याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आमदार सुनील शिंदे यांनी या तिन्ही आमदारांना आपल्या गाडीत बसवले.
त्यांच्या गाडीच्या अवतीभोवती सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या गाड्या होत्या. अशा कडेकोट बंदोबस्तामध्ये या तिन्ही आमदारांना वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी नेण्यात आले. तसेच आणखी काही आमदारांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरु आहेत.