प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. त्यातच आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात आज सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
राज्य शासनाने तसा अध्यादेशच काढलेला आहे. राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच, ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना पुढे आलेली आहे.
राज्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रगीताविषयी असणारी पवित्र भावना सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून एका अनोख्या विक्रमाद्वारे साऱ्या जगासमोर येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी लहान-थोर, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न ठेवता सर्वांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, या समूह राष्ट्रगीत गायनावेळी काही सूचनांचे पालन करावे लागणार आहे, जसे की, समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्याची सर्व संबंधितांनी विशेष काळजी घ्यावी.
काळी ठीक ११ वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११ ते ११:१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी. खासगी आस्थापना,संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक राहील.
जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमासाठी जिल्ह्याचे संनियंत्रण करावे, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय, सहकारी तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांना जिल्हाधिकारी स्तरावरून या उपक्रमाबाबत अवगत करून समूह राष्ट्रगीत गायनासाठी जाहीर आवाहन करावे.