Share

ST strike : पुन्हा एसटी संप होणार? दिवाळीच्या तोंडावर ‘या’ कारणामुळे एसटी कर्मचारी सरकारवर संतापले

काही दिवसांवर दिवाळी आली आहे, त्यामुळे आतापासूनच सर्वजण दिवाळीच्या खरेदीला लागले आहेत. अनेकांच्या घरात फराळाची तयारी सुरू झाली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मात्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिवाळी तोंडावर आली तरी, अनेक एसटी कर्मचारी अद्याप सप्टेंबर महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप सप्टेंबर महिन्याचा पगार मिळाला नाही. त्यामुळे एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

एसटी महामंडळातील प्रशासकीय विभागातील २५ टक्के अधिकारी, कर्मचारी यांना पगार मिळालेला नाही. उर्वरित अधिकारी-कर्मचारी यांच्या बँक खात्यांत शुक्रवारी-शनिवारी पगार जमा करण्यात आला. मात्र, काही कर्मचाऱ्यांचे पगार केव्हापर्यंत खात्यात जमा होतील, याबाबत माहिती नाही.

दरम्यान, राज्य सरकारकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेण्यात येईल, असे महामंडळाने उच्च न्यायालयात सांगितले होते. आता राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर पगार होण्याची शक्यता आहे.

नुकतीच, केंद्रीय, तसेच मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनसची घोषणा झाली आहे. सरकारकडून एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी अनुक्रमे पाच हजार आणि अडीच हजार रुपये अशी भेट देण्यात येत असते.

मात्र आता पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने दिवाळी भेट मिळणार की नाही, याबाबत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये साशंकता आहे. अनेक एसटी कर्मचारी सप्टेंबर महिन्याच्या पगाराची वाट पाहत आहेत, त्यांना पगार दिवाळीच्या आधी मिळणार का हे पाहावं लागेल.

राज्य

Join WhatsApp

Join Now