वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एसटी कर्मचारी चोर आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळजनक आरोपांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी आहे, मात्र ते एसटीच्या चोरीवर गप्प आहेत. ते बोलत नाहीत म्हणजेच ते या लुटीत सहभागी आहेत. ते चोर आहेत. असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, एसटी कर्मचारी स्वार्थी आहेत. त्यांना पगारवाढ पाहिजे. मात्र, दुसरीकडे एसटीची चोरी होत आहे याबद्दल मात्र सगळे कर्मचारी मौन आहेत. केवळ स्वतःच्या पगाराचा विचार करतात. ते एसटीच्या लुटीवर बोलत नाहीत.
तसेच म्हणाले, जर एसटी कर्मचारी एसटीच्या लुटीवर बोलत नाहीत, म्हणजेच ते लुटीत सहभागी आहेत. असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांवर केला. तसेच यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीची युती कोणासोबत असेल यावर देखील भाष्य केलं.
आंबेडकर म्हणाले, पहिलं प्राधान्य कोणाला हा विषय नाही. वंचित बहुजन पक्षाच्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी काँग्रेस किंवा शिवसेनेबरोबर युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला कोणीही प्रतिसाद दिला नाही.
मात्र, जो कोणी पहिला प्रस्ताव देईल आणि जो प्रस्ताव सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची आम्ही भूमिका घेऊ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच आंबेडकर म्हणाले, जसे भाजपला उद्धव ठाकरे नको होते तसे एकनाथ शिंदे देखील भाजपला नको आहेत.