Share

गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडीच्या गोविंदासाठी विधानसभेत मोठी घोषणा केली. त्यांनी दहिहंडी प्रो-गोविंदा स्पर्धेला मान्यता दिली, यामुळे आता सर्वच स्तरातून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे.

म्हणाले, कष्ट करुन अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असून तो तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे सरकारला इशारा दिला आहे.

श्रीकांत शिंदे म्हणाले, राज्यात दहिहंडी, गणेश उत्सव, नवरात्र या सारखे अनेक उत्सव आणि सण साजरे केले जातात. असे उत्सव डोळ्यासमोर ठेवून सरकार तरुणांना नोकरी देणार असेल तर १२-१२ तास अभ्यास करुन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील अनेक तरुणांना अद्याप नोकरी नाही. त्यात आता दहीहंडी फोडणाऱ्या तरुणांना नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, असे शिंदे म्हणाले.

तसेच ग्रामीण खेळांडूमध्ये नकारात्मकतेची भावना निर्माण होण्याची भीती असल्याची चिंता देखील श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. अभ्यास करुन यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा अगोदर विचार करावा. ग्रामीण भागातील खेळांवर अन्याय करणारा हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या या सारखे अनेक खेळ जिवंत आहेत. या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या तरुणांना नोकरीत आरक्षण देण्याची खरी गरज असताना, केवळ शहरी भागापुरता मर्यादीत असणाऱ्या दहिहंडीला मात्र शिंदे सरकारने खेळाचा दर्जा दिला आहे. या निर्णयाचा शिंदे सरकारने गांभीर्याने फेरविचार करण्याची सध्या गरज आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now