शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता ठाकरे घराण्यात देखील फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांचे भाऊ जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी, बाळासाहेब ठाकरे यांच्या सून, चित्रपट निर्माती स्मिता ठाकरे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावजय स्मिता ठाकरे यांचे दीर उद्धव ठाकरे यांच्याशी सख्य नसल्याचे सर्वश्रुत आहे. गेली अनेक वर्षे राजकारणापासून दूर असलेल्या स्मिता ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
पुढच्या ८ दिवसात त्या शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भेटीनंतर बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्याकडे मी आदराने बघते. ते आमच्यासाठी खूप जुने कार्यकर्ते आहेत. एक व्यक्ती म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.
स्मिता ठाकरे या जयदेव ठाकरे यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. १९८७ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. मात्र १९९५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर जयदेव ठाकरे यांनी अनुराधा यांच्याशी तिसरा विवाह केला. मात्र याच विवाहावरुन बाळासाहेब ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचे संबंध बिघडले असल्याचे सांगितले जाते.
बाळासाहेब ठाकरे यांना जयदेव यांचा हा तिसरा विवाह करण्याचा निर्णय आवडला नसल्याचे बोलले जाते. स्मिता ठाकरे या सध्या चित्रपट क्षेत्राशी संबंधित असून त्या चित्रपट निर्मित्या आहेत. सामाजिक कार्यातही स्मिता यांचे मोठे नाव असून अगदी सुरुवातीपासूनच त्यांना राजकीय महत्वकांक्षा असल्याचे दिसून येते.
जयदेव ठाकरे यांना राजकारणात कोणताही रस नव्हता. मात्र स्मिता ठाकरे यांची राजकीय महत्वकांक्षा वाढत गेल्यानेच दोघांमध्ये बिनसले आणि जयदेव ठाकरे यांनी स्मिता यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.