काल उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधी त्यांनी दोन शहरांच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव असं नामांतर करण्यात आलं.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. मात्र, अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातही त्यावर निर्णय होऊ शकला नाही.
मात्र, आता महाविकास आघाडी सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर असताना, अशावेळी औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याचा निर्णय काल मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
इम्तियाज जलील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कुणीही लोक दिसले तर त्यांच्या फोटोंवर जोड्यांची माळ घाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं, पाहा आम्ही तुमचं कसं स्वागत करतो, असा इशारा जलील यांनी दोन्ही पक्षाला दिला.
म्हणाले, आज आमची संपूर्ण नाराजी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे. यांनी आतापर्यंत आपली सत्ता वाचवण्यासाठी कोणासोबतही गेले. कॅबिनेट मीटिंगमधून दोन काँग्रेसचे मंत्री बाहेर आले होते, त्यांना थोडीही लाज असेल तर आजच राजीनामा द्यावा. अशाप्रकारचे नाटक करुन लोकांना मूर्ख बनवू नका.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोवर चपलाचा हार घातला पाहिजे. राजकारणासाठी हे नेते अतिशय खालच्या पातळीवर आले. राष्ट्रवादी, काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले तर त्यांच्या अंगावर थुंका, सत्तेचा एवढाच मोह होता तर सत्तेला चिटकून बसायला हवं होतं. असेही इम्तियाज जलील काल पत्रकांराशी बोलताना म्हणाले.
यावेळी जलील यांनी प्रमुख नेत्यांवर देखील टीका केली. म्हणाले, मला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी,अशोक चव्हाण आणि मराठवाड्यातील सर्व नेत्यांना विचारायचंय, हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा तोंडात लाडू टाकून बसला होता काय?आता औरंगाबाद येऊन दाखवा मग दाखवतो तुम्हाला, असे जलील म्हणाले.