महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे ते सध्या महाराष्ट्र राजकारणात चांगलेच चर्चेत आहेत. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भोंग्यावरून राज्य सरकारला इशारा दिला. यावर आता अभिनेता सोनू सूद याने प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू सूद नेहमीच काहींना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्याने राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर दिलेली प्रतिक्रिया होय. 1 मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवर राजकीय वातावरण तापलं आहे.
राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच सोनू सुदने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत येत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या परिस्थितीवर सोनू सूदने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. म्हणाला, मला असे वाटतं की देशाचा विकास तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा आपण धर्म, जाती या सर्वांतून बाहेर पडू.
तसेच म्हणाला, देशाला एकत्र येणे फार महत्वाचे आहे. जी ताकद हनुमान चालिसामध्ये आहे, तीच ताकद नमाज आणि आझानमध्ये असते. या दोन्हीही ऐकण्यासाठी तितक्याच चांगल्या वाटतात. त्याचे पावित्र्यही तेवढेच आहे. धर्म हा लोकांनी बनवला आहे.
यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. देशात रोजगार आणि इतरही अजून समस्या आहेत, अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे जर आपण याच गोष्टीत अडकून राहिलो तर लोकांच्या समस्या कधीही संपणार नाहीत. त्यापुढे इतर कोणत्याही गोष्टींचा फरक पडत नाही, असे सोनू सूद म्हणाला.
दरम्यान, राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये ते म्हणाले, मुंबईत 1140 मशिदी आहेत, त्यापैकी 135 ठिकाणी सकाळची अजान लावण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला होता, त्यांनी सकाळची अजान होणार नाही, असं सांगितलं होतं. मात्र, 135 मशिंदीवर काय कारवाई करणार का फक्त आमच्या लोकांना उचलणार आहात, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
तसेच म्हणाले, आम्ही हा विषय मांडला, मशिदींना हा विषय समजला, पोलिसांना, सरकारला आणि पत्रकारांना धन्यवाद देईन. लोकांना दिवसभर जो त्रास होतो तो कमी होईल, अशी अपेक्षा आहे. हा विषय फक्त मशिदींचा नाही, मंदिरावर जे भोंगे आहेत ते देखील खाली आले पाहिजेत.