Share

‘पिंपरी-चिंचवडच्या सर्व अडचणी सोडवतो, जनतेनं १०० नगरसेवक निवडून द्यावे’ – अजित पवार

सर्वोच्च न्यायालयानं इतर मागासवर्ग आयोगाबाबत दिलेल्या निकालानंतर आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं आता येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील औरंगाबाद, मुंबई, वसई विरार, कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणूका पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळंच आता भाजप आणि महाविकास आघाडीनं त्यादृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणूका लक्षात घेता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची संघटनबांधणी करायला सुरुवात केली आहे. ‘आगामी निवडणूकीत शिवसेना आणि कॉंग्रेसनं व्यवहार्य भूमिका घेतली तरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शहरात आघाडी करुन लढेल, नाही तर आम्ही वेगळं लढण्याच्या तयारीत आहोत, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची नवी कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले की पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे शंभर नगरसेवक निवडून द्या, शहराच्या पाण्यासह आणखी प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मी तुम्हाला देतो, माझ्या स्वभावात स्टंटबाजी नाही, असंही पवार यावेळी म्हणाले. त्यामुळं आता अजित पवारांच्या या विधानानं महापालिका निवडणूकांचं रणशिंगच फुकल्याचं बोललं जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील विविध कार्यकर्त्यांना पक्षानं विविध जबाबदारी दिल्यानं आता त्यांनी तातडीनं कामाला लागण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. याशिवाय विरोधकांच्या जाळ्यात न अडकता, विरोधकांनी निर्माण केलेल्या ट्रॅपमध्येही फरफटत जाऊ नये, असा सल्लाही पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. यावेळी या कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, समन्वयक योगेश बहल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या अडीच वर्षांपासून शहरात लोकांना दिवसाआड पाणी मिळत आहे, त्यामुळं या निवडणूकीत शहरातील लोकांना राष्ट्रवादीला साथ दिल्यास शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी मी सहकार्य करेन, असा शब्दही अजितदादांनी पिंपरी चिंचवडकरांना दिला आहे.

त्याचबरोबर शहराला कमी पडत असलेल्या पाण्याच्या समस्येला अजित पवारांनी पालिकेतील सत्ताधारी भाजपला जबाबदार धरलं आहे. सरकारनं पिंपरी चिंचवड शहरासाठी आणलेल्या भामा, आसखेड आणि आंद्रा धरणातून मंजूर केलेलं २६७ एमएलडी पाणी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या लोकांना शहरातील नागरिकांना देता आलेलं नाही. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय लोकांना पाणी देणार, असा टोलाही अजित पवारांनी भाजपला लगावला आहे.

त्याचबरोबर सत्ताधारी शहरातील कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम करण्यात व्यस्त आहे, भाजपच्याच काय तर त्यांच्या कोणत्याही सहकारी पक्षाला पिंपरी चिंचवड शहराविषयी आपुलकी आणि जिव्हाळा नाही, यांच्याकडे शहरासाठी वेळ नाही, अशीही टीका पवारांनी भाजपच्या नेत्यांवर केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता मिळाल्यास मागच्या पाच वर्षांचा बॅकलॉग भरुन काढू, याशिवाय शहरात दुप्पट वेगानं विकासकामं करू, असं आश्वासन अजित पवार यांनी शहरातील नागरिकांना दिलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ ला झालेल्या पराभवाची सल अजितदादांच्या मनात असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं.

२०१७ मध्ये देशात आणि राज्यात असलेल्या मोदी लाटेमुळं त्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळं आता राष्ट्रवादी या दोन्ही महापालिकांमध्ये जोरदार कमबॅक करणार की भाजप सत्ता राखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now