पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून आपल्या आईला पत्र लिहिले आहे, जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रात संजय राऊत यांनी, आपण हरलो नसून अन्यायाविरुद्ध लढण्यावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले आहे.
या पत्रात संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे आणि आपल्या आईविषयी अनेक भावनिक उद्गार काढले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच संजय राऊत यांचे हे भावनिक पत्र शिवसेनेच्यादृष्टीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गेमचेंजर ठरू शकते, अशी चर्चा आता सुरू आहे.
राऊत यांनी या पत्रातून आईपासून दुरावल्यामुळे मनाने हळवा झालेला मुलगा तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारा शिवसैनिक अशी दोन रुपं दाखवून दिली आहेत. संजय राऊत यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यांनी लिहिले, आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आला आहे. रविवारी (१ ऑगस्ट) ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस.
तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस.
तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये’ म्हणालीस, खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज सामनात किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रु रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास.
तसेच लिहिले, महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहज कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही.
अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही काय? शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मराठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो.
https://www.facebook.com/100044272187486/posts/pfbid02wjf9HnHG86ougA1AtByBE4VvEf5tk6c3Ch4H6MwzaQM21HSHGUhck8yXKk9DSvsTl/
शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते.
जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल, अशा धमक्या होत्या. या धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज दूर तुझ्यापासून आहे. तरीही चिंता नसावी, असे संजय राऊत यांनी लिहिले.