पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली होती. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यात काँग्रेसमुळे कोरोना पसरला आहे, असे म्हणत अनेक आरोप काँग्रेस वरती केले होते. यावर आता काँग्रेस आक्रमक झाली असून, काँग्रेसने राज्यभर आंदोलन करत पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला. यावर, भाजप नेत्यांनी त्यांना धमकीवजा इशारा दिला आहे.
मोदींनी संसदेत काँग्रेसवर केलेल्या टिकेवर नाना पटोले म्हणाले होते की, पंतप्रधान संसदेत कसे भाषण करतात? त्यांना जनता कधीही माफी करणार नाही. लोकांना तोडण्याचे काम भाजप नेहमी करत आहे. पंतप्रधान मोदी छत्रपती यांचा अपमान करत होते. तेव्हा भाजपचे सदस्य बाक वाजवत होते, याचा निषेध म्हणून फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार आहे, असा इशारा नाना पटोले यांनी दिला होता.
यावर आता भाजपकडून देखील नाना पटोले यांना प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी तर नाना पटोले यांचा थेट एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येऊनच दाखवा, असं थेट प्रतिआव्हान नाना पटोले यांना दिलं आहे.
लाड यांनी या संदर्भात एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले ”नाना तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतोय. हिंमत आहे तर सकाळी 10 वाजता येऊनच दाखव. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही भाजपवासी नाही, सागरवर तू ये पाहतो तू परत कसा जातो ते”, अशा शब्दात पटोले यांना आव्हान दिले आहे.
https://twitter.com/PrasadLadInd/status/1492828333683339270?t=CHBDSdAJiApp-b0EWrOk9g&s=19
तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी भाजप कार्यकर्त्यांना नाना पटोले यांच्या स्वागतासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेसनं फडणवीसांच्या बंगल्यावर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पटोले म्हणाले होते की ”देशभरातील तरूण आज बेरोजगार झाले आहेत. तरूणांना रोजगार देता येत नाही. त्यामुळे हिजाबसारखे मुद्दे चर्चेत आणले जात आहेत. निवडणुका आल्या की समाजात भाजप फूट पाडत असतो. भाजपचा सर्व निवडणुकांमध्ये पराभव होत आहे. त्यामुळे त्यांना असे मुद्दे चर्चेत आणावे लागतात, “असे पटोले म्हणाले होते.