महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणात मशिदिवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काल 3 मेला त्यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट टाकत या घटनेवर आपलं मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. म्हणाले, ‘हनुमान चालिसा वाचणे राजद्रोह ठरवणारे महाविकास आघाडी सरकार खासदार-आमदार दांपत्यांला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय.’
म्हणाले, ‘काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे .या परिस्थितीत न्यायालयाने आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळे काय होणार आहे? बेकायदा भोंग्याच्या आवाजाने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केलेय.’
‘हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल.’ असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=538190517675480&id=100044536083059
दरम्यान, औरंगाबाद शहरातील सिटी पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंवर तीन कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. कलम 116 कलम 117 आणि कलम 153 अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या आहेत.
पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक देखील केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, मशिदीवरचे भोंगे 4 मे पर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होते मात्र, याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.