जेष्ठ गायक आनंद शिंदे यांनी ‘आमदारांच्या यादीतून मला डावललं तर मी राज्यपालांवर केस करेन. मी गप्प बसणार नाही’, असे थेट आव्हान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. आनंद शिंदे थेट राज्यपालांना भिडल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होत आहे.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने नवी यादी दिली आहे. त्याबाबत बोलताना आनंद शिंदे यांनी राज्यपालांना आव्हान दिलं आहे.
आनंद शिंदे यांची कलावंतांच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. पण, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना नवी यादी दिल्यामुळे याबाबत आनंद शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आनंद शिंदे म्हणाले, कोणतीही यादी देऊ द्या. राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदार निवडीच्या निकषांत मी बसतोय. पहिलं महाविकास आघाडी सरकारसुद्धा निकषांत बसणारं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला धरूनच ते सरकार सत्तेवर आलं होतं.
तसेच म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने जी नावं दिली होती, त्यात मी निकषात बसणारा आहे, त्यामुळे माझी नियुक्ती होणार नाही, असं होऊच शकत नाही. शिंदे सरकारने पहिली यादी रद्द करू अथवा काहीही करू. पहिली यादी मंजूर का करत नाही आहात, याचं उत्तर तर राज्यपालांना द्यावंचं लागणार आहे. असे शिंदे म्हणाले.
आनंद शिंदे म्हणाले, या यादीतील व्यक्ती कोणत्या निकषांत बसत नाहीत हे मला राज्यपालांनी सांगावं, मी जर निकषात बसत नसेल तर माझे नाव त्यातून काढलं तर हरकत नाही. पण, आंबेडकरांचं संविधान आहे, त्यामुळे राज्यपालांना प्रथम पहिल्या यादीचाच विचार करावा लागणार आहे असे शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी याबाबत बोलताना राज्यपालांना आव्हान केलं की, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून मला डावललं तर मी राज्यपालांवर केस करेन. मी गप्प बसणार नाही. कारण, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील कार्यकर्ता आणि गायक आहे. शिंदे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होत आहे.