Share

..त्यामुळे मी अर्जुनचे सामने बघायला कधीच जात नाही, सचिन तेंडुलकरचा मोठा खुलासा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या आणि त्याच्या मधील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. आपल्या मुलाचे सामने पाहण्यासाठी तो स्टेडियममध्ये का जात नाही याचे कारण सांगितले आहे. सचिनने सांगितलेल्या कारणामुळे चाहत्यांमध्ये त्याच्याबाबतचा असणारा आदर अजून वाढला आहे.

सचिन तेंडुलकरने सांगितले की, ‘मला अर्जुनला क्रिकेटच्या प्रेमात पाडायचे आहे, त्यासाठी त्याला ते स्वातंत्र्य द्यायचे आहे. त्यामुळे मी त्यांचे सामने बघायला जात नाही.’ अर्जुन सध्या मुंबईच्या संघाचा भाग आहे. आयपीएल मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाखांना विकत घेतले आहे.

अमेरिकन पत्रकार ग्रॅहम बेन्सिंगरच्या यूट्यूब चॅनलवर अर्जुनबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, जेव्हा आई आणि वडील आपल्या मुलांचे सामने पाहायला जातात तेव्हा मुलांना दडपण जाणवते. त्यामुळेच मी अर्जुनचे सामने पाहायला जात नाही. कारण मला त्याला क्रिकेटच्या प्रेमात पडण्याचे स्वातंत्र्य द्यायचे आहे. त्याचे लक्ष त्याने ठरवले पाहिजे,आणि खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यामुळे, मी त्याचे सामने पाहायला जात नाही.

तसेच म्हणाला की, तो अर्जुनचा सामना जरी पाहायला गेला तरी तो गुपचूप जाऊन पाहतो, कोणाला त्याची माहिती होऊ देत नाही. अर्जुनबरोबरच तेथील प्रशिक्षक आणि स्टेडियममधील इतर लोकांनाही माहित नसते की मी त्याचा सामना पाहत आहे. आमच्यापैकी कोणीही अर्जुनवर क्रिकेट खेळण्यासाठी दबाव टाकला नाही. तो आधी फुटबॉलमध्ये होता आणि नंतर बुद्धिबळ खेळायचा. त्याच्या आयुष्यात क्रिकेट नंतर आले. अर्जुनने आता क्रिकेटमध्ये करिअर केले आहे. असे सांगून सचिनने तमाम पालकांना देखील या मार्फत संदेश दिला आहे.

अर्जुन आता देशांतर्गत क्रिकेटशिवाय तो आयपीएलही खेळत आहे. यापूर्वी तो 20 लाखांना मुंबई संघाशी जोडला गेला होता आणि आता त्याला 30 लाखांना विकत घेण्यात आले आहे. मुंबई व्यतिरिक्त गुजरातने त्याला लिलावात खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले होते.

दरम्यान, सचिनला विराट आणि त्याच्यापैकी कोण चांगला खेळाडू आहे, असा प्रश्नही विचारण्यात आला. याला उत्तर देताना सचिन म्हणाला की, तुम्ही दोन्ही खेळाडूंना तुमच्या संघात एकत्र का ठेवू शकत नाही. सचिननंतर विराट हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके झळकावली आहेत.

यावेळी सचिनने बेन्सिंगरसोबतच्या संवादात निवृत्तीच्या दिवसाची आठवण करून दिली आणि म्हणाला, मी कोपऱ्यात एकटा बसून रडत होतो. माझ्या हातात टॉवेल होता, मी खूप भावूक झालो होतो. त्यावेळी विराट माझ्याकडे आला आणि त्याने मला एक पवित्र धागा मला दिला, जो त्याच्या वडिलांनी त्याला दिला होता. मी तो धागा काही काळ माझ्याकडे ठेवला आणि नंतर परत दिला. कारण, मी त्याला म्हणालो तो धागा मौल्यवान आहे आणि तो फक्त तुझ्याकडेच ठेवला पाहिजे.

खेळ

Join WhatsApp

Join Now