इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागण्याच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल आला आहे. समितीने इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्यामागे कारणीभूत असणारे कारण सांगितले आहे.
देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचा जीव या अपघातात गेला. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या घटनांना आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल आला आहे.
या समितीला प्राथमिक तपासणीत जवळपास सर्व इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बॅटरी सेल आणि डिझाइनमध्ये समस्या आढळल्या आहेत. समितीने दिलेल्या या अहवालामुळे आता इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक अडचणीत येऊ शकतात. माहितीनुसार, बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधून यावर उपाय सुचवणार आहेत.
तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात गेल्या महिन्यात, इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर इतर दोघे जखमी झाले होते. या घटनेचा देखील समितीने तपास केल्यानंतर कळाले की, तेलंगणातील बॅटरी स्फोट प्रकरणासह जवळपास सर्वच घटनांमध्ये बॅटरीच्या डिझाइनमध्ये तसेच बॅटरी सेलमध्ये बिघाड आहे.
नुकतेच तामिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यात एक प्रकरण घडलं होतं. स्कूटर मालक त्यांच्या घरी इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करत होते. यादरम्यान स्फोट झाला आणि धुरामुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. तसेच तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मानापराई येथे एका इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना देखील ताजी आहे.
अलीकडेच, एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका त्रस्त ग्राहकाने ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर गाढवाच्या सहाय्याने ओढली आणि शहरभर या स्कूटरची परेड काढली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाला होता. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.