…म्हणून भाजपने संजय राठोडांची, त्यांच्या बायका मुलांची आणि संपूर्ण बंजारा समाजाची माफी मागावी

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला आहे. त्यात पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गंभीर आरोपी असलेले आमदार संजय राठोड यांना देखील शिंदे गटाकडून मंत्रिपद दिलं गेलं आहे. त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.

संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून भाजपवर टीका केली आहे. त्यांनी भाजपला संजय राठोड यांच्या कुटुंबीयांना माफी मागण्यास सांगितलं आहे.

सुप्रिया सुळे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. त्यांना संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली होती, त्यावर त्या म्हणाल्या, भाजपने संजय राठोडांची, त्यांच्या बायकोची, मुलांची आणि संपूर्ण बंजार समाजाची माफी मागावी.

तसेच म्हणाल्या, संजय राठोडांबद्दल आमचं मत त्यादिवशी तेच होतं आणि आज देखील तेच आहे. आम्ही तेव्हाही म्हणत होतो संपूर्ण तपास होऊद्या, घाईघाईने त्यांच्या राजीनाम्याचा आग्रह करू नका. परंतु, भाजपने राजीनाम्याचा फार आग्रह केला.

भाजपने संजय राठोड यांना तुरुंगात टाकण्यापर्यंतची भाषा केली, आणि आता त्यांनीच क्लिन चीट देऊन त्यांना सरकारमध्ये आणलं. त्यामुळे राठोड यांच्या वतीने आता आमची भाजपला विनंती आहे की त्यांनी राठोड यांच्या बायकोची, मुलांची, आणि बंजार समाजाची माफी मागावी.

तसेच म्हणाल्या, पूजा चव्हाण या महाराष्ट्रातील मुलीवर कुणी अन्याय केला? याचा तपास व्हायला हवा. ती महाराष्ट्रातील लेक आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे, असे सुप्रीम सुळे म्हणाल्या. आता भाजप याचं उत्तर काय देणार पाहावं लागेल.