मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेला डुग्गू अखेर पुणे पोलिसांना सापडला. ११ जानेवारीला पुण्यातील बालेवाडी परिसरातून डुग्गु उर्फ स्वर्णव चव्हाण बेपत्ता झाला होता. त्यानंतर दहा दिवसांनी अखेर स्वर्णव पुणे पोलिसांना सापडल्यामुळे त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावला नाही. डुग्गू सापडल्याने संपूर्ण महाराष्ट्रभरातून पुणे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. तर आता मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे.
सिद्धार्थने त्याच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करत पुणे पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. ट्विटमध्ये त्याने लिहिले की, ‘अभिनंदन पुणे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता सर आणि पुणे पोलीस…. मनापासून आभार…- एक बाप’ सिद्धार्थने एका वडिलांच्या भावनेने पुणे पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
अभिनंदन पुणे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता सर आणि पुणे पोलीस…
…..मनापासून आभार..
– एक बाप 🙏🙏🙏🙏— SIDDHARTH JADHAV 🇮🇳 (@SIDDHARTH23OCT) January 19, 2022
दरम्यान, मंगळवारी (११ जानेवारी) सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून स्वर्णव ऊर्फ डुग्गु सतीश चव्हाण (वय ४ वर्षे ) यास एक मुलगा ‘डे केअर’ला सोडविण्यासाठी पायी घेऊन जात होता.
त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने मोठ्या मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला गाडीवरुन उचलून नेत त्याचे अपहरण केले होते. हा प्रकार बालेवाडी पोलिस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला. याप्रकरणी मुलाच्या आई-वडीलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर डुग्गुला शोधण्यासाठी पुणे पोलिसांची एक मोठी फौज तैनात करण्यात आली होती. त्याच्या शोधावेळी अत्यंत गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडेतीनशेच्यावर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलाचा शोध घेत होते. अखेर बुधवारी वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले.
पुनावळ्यातील लोटस पब्लिक स्कूलच्या जवळ एक इमारत आहे. तिथे स्वर्णवला अज्ञात व्यक्तीने सोडले आणि त्याच्या बॅगेत एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात त्याच्या वडिलांचा नंबर होता. तेथील सुरक्षा रक्षक दादाराव जाधव याने बॅगेत असलेल्या चिठ्ठीवरील नंबरवर व्हिडिओ कॉल करून मुलगा त्यांचा आहे का? ही खात्री करून घेतली.
त्यानंतर मुलाचे कुटुंबीय त्या ठिकाणी आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान, त्याचं कोणी अपहरण केलं? का केलं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुणे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
‘या’ तारखेपासून राज्यातील सर्व शाळा होणार सुरु; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
डुग्गू सापडल्याच्या आनंदावर विरजण! आजच्या धक्कादायक घटनेने चव्हाण कुटूंबावर शोककळा
‘हा’ स्टॉक नाही कुबेराचा खजाना आहे, १ वर्षात दिलाय २००० टक्के छप्परफाड रिटर्न