मात्र, मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेनंतर आता शिवरायांसंदर्भातील विधानावर आक्षेप घेतला जात असून, राज ठाकरे यांच्यावर टीका होतं आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केले होते. यावरून आता चांगलच राजकारण रंगलं आहे.
यावर औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘जेम्स लेनला मदत करणारे पुरंदरे आणि त्यांना मदत करणारे राजसुद्धा महाराजांना बदनाम करण्याच्या कटात सहभागी आहेत, असे श्रीमंत कोकाटे म्हणाले.
राजसुद्धा महाराजांना बदनाम करण्याच्या कटात सहभागी असल्याने त्यांनी माफी मागावी, अन्यथा राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे म्हणत कोकाटे यांनी राज यांच्यावर हल्लाबोल चढवला. याचबरोबर पुढे बोलताना कोकाटे यांनी राज ठाकरेंना एक सवाल देखील उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्यांचे समर्थन करतात, याला आमचा विरोध आहे. राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेतात, त्यांच्यामते मग शिवाजी महाराज, जिजाऊ हिंदु नाहीत का?’ असा संतप्त सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ‘राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर असावा आमचा काही संबंध नाही. फक्त महाराजांचा अवमान करणाऱ्या लोकांचे तुम्ही समर्थक कसे इतकाच आमचा सवाल आहे,’ असे कोकाटे यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे मनसेकडून 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
मात्र, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि GAC संघटनांनी विरोध दर्शवला आहे.






