देशातील विविध भागात दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हे प्रशिक्षण जुदो-कराटेच्या क्लासेसमधून देण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास एजन्सीने तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील काही प्रशिक्षण केंद्रांवर छापेमारी केली, तेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला आहे.
एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणाद्वारे तरुणांची दिशाभूल केली जात आहे. तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची पहिल्यांदा माहिती ऑगस्टमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तेलंगाणा पोलिसांना मिळाली होती.
तेलंगाणा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तसेच काही जणांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर याचे अनेक फाटे समोर आले. यानंतर याची संपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला देण्यात आली. त्यानंतर केंद्रानं याच्या तपासाची जबाबदारी एनआयएवर सोपवली.
यासंदर्भात एनआयएनं रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामध्ये ३२ हून अधिक ज्युदो-कराटे क्लासेसवर छापेमारी केली. या कारवाईत चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
एवढेच नाही तर, अशा प्रकारे ज्युदो-कराटे क्लासेसमधून दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देण्याचा प्रकार देशातील अनेक भागांमध्ये सुरु आहे. यामध्ये केरळ, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे, असं एनआयएनं म्हंटलं.
एनआयएनं म्हटलं की, सोशल मीडियाच्या माध्यमातून याची सुरुवात होते. सुरुवातीला फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअँपच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क केला जातो. त्यानंतर त्यांना धर्माच्या आधारावर भडकवलं जातं. त्यानंतर यामध्ये यशस्वी ठरणाऱ्या तरुणांना पुढील टप्प्यासाठी निवडलं जातं.
त्यानंतर त्यांना ज्युदो-कराटेच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. या क्लासेसमध्ये त्यांना धर्मावर आधारित द्वेषाची बीजं रोवण्याचं काम केलं जातं. त्यानंतर हेच तरुण पुढे देशातील विविध देशविरोधी कारवायांमध्ये सामिल होतात, असे एनआयएनं म्हंटलं आहे.






