बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनसबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. निक जोनसला एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. प्रियांका चोप्राच्या चाहत्यांना याबद्दल माहिती कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या सोशल मीडियावर चाहते निक जोनसची विचारपूस करत आहेत.
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे अनेक आजार लोकांना होतात. सध्या अगदी कमी वयातील लोकांना देखील आजाराने ग्रासले आहे. त्यातच आता प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचा देखील नंबर लागलेला आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत निक जोनसने त्याच्या आजाराबद्दल खुलासा केला आहे.
निक जोनसला मधुमेहाचा आजार आहे. त्याने त्याच्या मधुमेहाचे निदान आणि त्याला जाणवलेल्या लक्षणांबद्दल नुकताच खुलासा केला आहे. त्याने सांगितले की इतके वर्षे प्रारंभिक लक्षणांनी तो हैराण झाला होता. इतकी वर्षे लोटल्यानंतर आता तो ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यास शिकला आहे.
माहितीनुसार, निक जोनस टाइप-1 मधुमेहाने ग्रस्त आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील स्वादुपिंड म्हणजेच पॅन्क्रियाज खूप कमी प्रमाणात किंवा इन्सुलिन तयारच करत नाही. लहान वयातच याचे निदान होणे हा एक अनुवांशिक विकार आहे.
या विकाराला अनेकदा किशोरवयीन मधुमेह म्हणजेच जुवेनाईल डायबिटीज म्हणून ओळखले जाते. ही एक क्रॉनिक कंडिशन आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर औषधोपचाराची गरज असते. सध्या निक जोनस 29 वर्षांचा आहे. त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
एका मधुमेह जनजागृती कार्यक्रमात निक जोनस म्हणाला, फक्त 13 वर्षांच्या वयात असताना मला सांगण्यात आलं की, मला मधुमेह आहे त्यामुळे माझा मृत्यू देखील होऊ शकतो. मात्र, त्यानंतर मला या विचाराने भीती वाटत होती. पण प्रामाणिकपणे मी ही नवीन गोष्ट कशी हाताळायची हे रुग्णालयात शिकत होतो.