दिवसेंदिवस पत्रकारांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचं चित्र समोर येत आहे. प्रामाणिक पत्रकाराने जर समाजातील एखाद्या नाजूक मुद्यावर आपली मतं मांडण्याचा, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर काही समाज घटकांकडून त्याला नक्कीच विरोध केला जातो. काही वेळेस पत्रकारांचा जीव देखील धोक्यात येतो.
अशीच एक घटना एका पत्रकारासोबत घडली आहे. निकेश कोक असे या पत्रकाराचे नाव असून, वृत्तपत्रात म्हसळा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. त्याला साजिद इनामदार या आरोपीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. साजिद इनामदार हा एक रेल्वे पोलीस आहे.
काल 10 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निकेश हा आपल्या कामासाठी बाजारपेठेत गेला होता. काम आटोपून निघाला असता साजिद याने त्याला अडवून बातमी दिल्याने माझी बदनामी झाली असे बोलून हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत निकेश जखमी होऊन त्याच्या उजव्या डोळ्याला जखम झाली आहे.
बाजूच्या दुकानदारांनी मध्यस्थी करून मारहाण थांबवली. तोपर्यंत निकेश गंभीर जखमी झाला होता. निकेश याने दिघी सागरी पोलीस ठाण्यात साजिद विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून साजिद याला अटक करण्यात आली आहे.
साजिदने मारहाण केल्याचे कारण म्हणजे, 2019 साली साजिद इनामदार याच्या तीन तलाक संदर्भात त्यांच्या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे आपली बदनामी झाली असून बातमी लावल्याचा राग साजिद याने मनात ठेवला होता. या रागातून त्यानं निकेशला मारहाण केली.
दरम्यान, तालुका कडेगाव येथील पत्रकार सुरज संजय जगताप यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. आमची माहिती तहसीलदार आणि प्रांत यांना का देतो या कारणामुळे हणमंत किसन वाघमोडे आणि जयपाल किसन वाघमोडे या दोन आरोपींनी त्याला मारहाण केली आहे.