झारखंड राज्यातील गुमला जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बलात्काराच्या दोन आरोपींना संतप्त ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर रॉकेल शिंपडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना गुमला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसुआ आंबटोली येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल केले. रांचीमधील रिम्समध्ये त्यांना पाठवण्यात आले.
यामध्ये, सुनील उरांव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दोन्हीवर बलात्काराचा आरोप होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुमला येथील भंडारा येथे एका लग्न समारंभात सहभागी होऊन आंबटोली गावातील एक कुटुंब आपल्या गावी परतण्यासाठी बसची वाट पाहत होते.
दरम्यान, शेजारील वसुआ पोकटोली गावातील दोन युवक मोटारसायकलवरून तेथे पोहोचले. बसची वाट पाहत असलेल्या कुटुंबातील १७ वर्षीय मुलीला गावाकडे नेण्यासाठी त्यांनी मोटारसायकलवरून लिफ्ट दिली. दोन्ही तरुण शेजारील गावातील असल्याने आणि कुटुंबाशी पूर्वीपासून ओळखीचे असल्याने पालकांनी मुलीला त्यांच्यासोबत पाठवले.
त्यानंतर मुलीच्या पालकांनी घरी येऊन पाहिले तर मुलगी अजून घरी आली नव्हती. तेव्हा कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. कुटुंबीयांना तरुणी एका ठिकाणी गंभीर अवस्थेत सापडली. तिच्यावर दोघांनी बलात्कार केला होता. ही माहिती गावात सगळीकडे पसरली.
या घटनेमुळे गावकरी संतप्त झाले. गावकऱ्यांनी आरोपींना पकडून गावात आणले. त्यानंतर दोघांवर देखील पेट्रोल टाकून जाळले. एवढेच नाही तर गावकऱ्यांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने देखील हल्ला केला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांना शांत केले आणि तरुणांना तात्काळ रुग्णालयात नेलं.
वेळीच माहिती मिळाली असती तर एवढी मोठी घटना घडली नसती, असे पोलिस निरीक्षक कमलेश पासवान यांनी सांगितले. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल. या घटनेत सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.