‘मेरे साई’ या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनी बाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. शूटिंग सुरू असताना अनाया सोनी अचानक सेटवर बेशुद्ध पडली असून, तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.
अनाया सोनीच्या वडिलांनी सांगितले की, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनाया सोनीची एक किडनी खराब झाली आहे. तिची किडनी बदलावी लागेल. अनाया सोनी सध्या डायलिसिसवर आहे. अनाया सोनीच्या वडिलांनी हेही सांगितले की सध्या अनायाची आर्थिक स्थिती चांगली नाही.
अनायावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, असे अनायाचे वडील म्हणाले. तसेच तिची किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे कुठून आणणार याची चिंता अनाया सोनीच्या वडिलांना आता सतावत आहे. अनाया सोनीने देखील तिच्या आर्थिक स्थितीबद्दल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
अनायाने तिच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘डॉक्टर सांगत आहेत की माझी किडनी निकामी झाली आहे आणि मला डायलिसिसवर जावे लागेल. माझे क्रिएटिनिन १५.६७ पर्यंत खाली आले आहे आणि हिमोग्लोबिन ६.७आहे.’
तसेच लिहिले की, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सोमवारी मी अंधेरी पूर्व येथे असलेल्या होली स्पिरिटमध्ये प्रवेश घेत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा माझे जीवन सोपे राहिले नाही. पण मी आजचे जगणे सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हो, ही वेळ येणार होती, हे मला माहीत होतं. पण ही वेळही जाईल. मी लवकरच किडनी प्रत्यारोपण करणार आहे, असे अनायाने लिहिले आहे.
माहितीनुसार, अनाया सोनी यांनी याआधी २०२१ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट टाकत आर्थिक मदत मागितली होती. २०१५ पासून अनाया सोनी एकाच किडनीवर जगत आहेत. काही वर्षांपूर्वी अनाया सोनीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एक किडनी दान केली होती. पण, आता दान केलेली किडनी देखील निकामी झाली आहे.






