अवघ्या सहा दिवसांच्या बाळाला घाटात फेकण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेच्या ठिकाणी बाळाचा टॉवेल सापडला असून बाळाचा शोध सुरू आहे. या घटनेने आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. सहा दिवस वय असलेल्या चिमुकल्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही धक्कादायक बातमी पुण्यातील घोटवडेमधून समोर आली आहे. अवघ्या सहा दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकले आहे. घटनेच्या ठिकाणी बाळाचा टॉवेल सापडला असून बाळाचा शोध सुरू आहे. पुणे पोलीस ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध घेतला जात आहे. पुण्यात या घटनेनं खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
बाळाची आई ही गोडांबेवाडी गावात मजूरी करते. तिचे नाव मंगल सचिन चव्हाण असं आहे. तिच्या पतीचं निधन झालं. तिला एक मुलगी आहे. गोडांबेवाडीत काम करताना महिलेचं आपल्याच चुलत भावावर प्रेम जडलं. तिच्या चुलत भावात अनैतिक संबंध सुरू झाले. या संबंधातून त्यांना एक मुलगा झाला.
ही बाब कुटुंबातील सदस्यांना मान्य नव्हती. त्यांनी त्यांच्या बाळाला नकार दिला. घटनेच्या दिवशी मंगल आणि त्यांच्या मुलीला घेऊन कुटूंब रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अंबडस गावी जायचे म्हणून घेऊन गेले. यावेळी त्यांच्यासोबत जन्मलेले सहा दिवसांचे बाळ देखील होते.
ज्या चुलत भावासोबत महिलेनं अनैतिक संबंध ठेवले होते, त्याच नाव सचिन गंगाराम चव्हाण आहे. घटनेच्या वेळी गाडीत सचिन आणि त्याचा भाऊ संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजित गंगाराम चव्हाण हे देखील होते. ताम्हिणी घटापाशी आल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली. मंगलच्या कुशीतील सहा दिवसांच्या बाळाला जबरदस्तीने घेतले. त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला दरीत टाकून दिले.
घोटवड्याला परतल्यानंतर बाळाची आई मंगलने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या चुलत भावाने बहिणीसोबत संबंध ठेवले आणि बाळाला जन्म दिला त्यानेच बाळाला अमानुषपणे ताम्हिणी घाटात फेकून दिल्याने सर्वांना धक्का बसला आहे.






