Share

Shinde group : शिवसेनेला धक्का! विरोधकांची चिरफाड करणारी ठाकरेंची विश्वासू वाघीणही शिंदे गटात जाणार

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये वाद- प्रतिवाद सुरू झाले आहेत. शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्ष आणि कार्यकर्ते कसे एकत्र ठेवायचे हा पेच सध्या उद्धव ठाकरेंपुढे निर्माण झाला आहे.

उद्धव ठाकरे एकीकडे पक्षबांधणीच्या कामाला जोर लावत आहेत, तर दुसरीकडे मात्र त्यांना एकापाठोपाठ एक धक्का बसत आहे. अनेक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतूक केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दीपाली सय्यद यांनी शिंदे यांचे तोंडभरून कौतूक केले. आता या कौतुकानंतर दीपाली सय्यददेखील शिंदे गटात जाणार का? अशा चर्चा राजकारणात होऊ लागल्या आहेत.

माध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. एवढेच नाही तर, ते कामं करण्याबरोबर अनेकांना भेटीगाठींसाठी देखील पुरेसा वेळ देत आहेत. त्यामुळे प्रत्येकाची कामं झटपट होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणतही काम घेऊन गेलो की ते त्वरेने पूर्णत्वास नेली जात आहेत. शिंदेंनी जो कामाचा झपाटा लावला आहे तो कमालीचा आहे, जर एखादी व्यक्ती झापाटून कामं करत असेल तर, त्याचं कौतुकदेखील होणं आवश्यक गरजेचं आहे असे दीपाली सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, रक्षाबंधनाच्या दिवशी देखील दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करत ट्विट केले होते. त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आता दीपाली सय्यद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या शिंदे गटात जाणार का अशी चर्चा होऊ लागली आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now