सध्या भारतात निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्ष आपली रणनीती करण्यात दंग आहेत. राज्य सरकारने नवी मुंबईत तिरुपती देवस्थानला मंदिर उभारण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले आहेत. या निमित्ताने शिवसेना सोलापूर मधील तेलगू भाषिक लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी तिरुपती देवस्थानला मंदिर उभारण्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिवसेनेने तेलगू समजाला आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर साद घातली आहे. सोलापूरात तेलगू भाषिक समाजातील तिरुपती बालाजीवर श्रद्धा असलेल्या भाविकांची संख्या अधिक आहे.
सोलापूर मधील हे भाविक वर्षांतून किमान एकदा तरी तिरुपती दर्शनासाठी जात असतात. सोलापुरातील हा तेलगू भाषिक वर्ग बऱ्यापैकी भाजपकडे झुकलेला आहे. मात्र, आता नवी मुंबई येथे तिरुपती देवस्थानला मंदिर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्यावरून शिवसेना या वर्गाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सोलापुरातील शिवसेनेने त्याबद्दलचा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी सोडली नाही. सोलापूरच्या पूर्व भागात दाजी पेठेतील श्री व्यंकटेश्वर देवस्थानात शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी महाआरतीचे आयोजन केले होते.
यावेळी, या महाआरतीत शेकडो शिवसैनिकांनी भगवे उपरणे परिधान करीत भगवे ध्वज उंचावत हिंदुत्वमय वातावरण निर्माण केले. दरम्यान, हिंदुत्वावरून भाजप शिवसेनेत मोठी कुरघोडी सुरू आहे. तिरुपती मंदिराच्या निर्णयानंतर आता शिवसेना आगामी निवडणुकीसाठी सोलापूरातील तेलगू भाषकांना आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सध्या हिंदुत्वाचे खरे पाईक कोण हे दाखवण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांना शह- प्रतिशह देण्याचे राजकारण सुरू केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी मधून याचा नेहमी प्रत्यय येत राहतो. त्यामुळे आता आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत कोणाचे पारडे जड होणार याची चर्चा सुरू आहे.