सध्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीचा आणि खासदारकीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच, आता संभाजीराजेंच्या उमेदवारीसाठी काही मराठा संघटना आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सध्या राज्यसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यात खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिली आहे. तसेच आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत संभाजीराजे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली.
दुसरीकडे, राष्ट्रवादीही संभाजीराजेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. मात्र भाजपने अद्याप वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. तसेच हे निर्णय वरीष्ठ पातळीवरून होत असतात अशी सावध प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. मात्र आता संभाजीराजेंच्या उमेदवारीसाठी काही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.
शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी परप्रांतीय असून त्यांना जागा दिली जाते मग संभाजी राजे यांना का नाही? असा सवाल आता संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच आम्ही मराठा आमदार, प्रमुख यांना भेटून आमची भूमिका सांगणार आहोत, असेही मराठा संघटनांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांनी संभाजी राजे यांना बिनविरोध निवडून द्यावे. दगा देण्याचा कोणी प्रयत्न करू नये राजकीय परिणाम होतील, छत्रपती संभाजी महाराज यांना बिनविरोध निवडून देण्याची संधी सगळ्या पक्षांना आली आहे. संभाजी राजे यांच्या उमेदवारीबाबत कोणाचा आकस असेल तर सातवा उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न होईल. असा कडकडीत इशाराही यावेळी मराठा संघटनांनी दिला आहे.
त्यामुळे आता शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे आणि भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे पक्ष पुढे काय भूमिका घेतात हे येत्या काही दिवसात समोर येईल. मात्र, आता मराठा संघटना आक्रमक झाल्याने राज्यसभेच्या जागेबाबत लवकर निर्णय होईल हे नक्की.