शिवसेनेची धडाडती तोफ भास्कर जाधव विधानसभेच्या विशेष अधिवेशनानंतर कुठेच दिसत नव्हते. भास्कर जाधव नेमके गेले कुठे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. नुकतेच भास्कर जाधव यांचे गावाकडील शेतात काम करणारे फोटो व्हायरल झाले. त्यात दिसत आहे की, ते कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत.
एकनाथ शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषण करताना भास्कर जाधव यांनी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. आमदारांनी केलेली बंडखोरी भास्कर जाधव यांच्या देखील चांगलीच जिव्हारी लागली आहे. ते विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील बंडखोर आमदारांवर चांगलेच बरसले होते.
भास्कर जाधव यांनी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन पावले मागे येण्याचं आवाहन देखील केलं होतं. या सगळ्या घडामोडीत भास्कर जाधव दिसले, मात्र त्यानंतर ते अधिवेशन संपताच आपल्या कुटुंबासह कोकणात गेले आणि शेतीत रमले आहेत.
समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. माहितीनुसार, भास्कर जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं.
महाराष्ट्रात गेल्या बारा-तेरा दिवस राजकीय नाट्य सुरू होतं . यामध्ये एकनाथ शिंदे गटातील आमदार सुरत गुवाहाटी गोवा त्यानंतर मुंबईत परतले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यावर किमान पंढरवड्यानंतर सर्व आमदार आपापल्या घरी परतलेले आहेत .
त्यात पालघरचे चर्चेत असलेले आमदार श्रीनिवास वणगा हे देखील गावाकडे गेले आहेत. त्यांनी स्वतः आपल्या शेतात उतरत भात रोपणीला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या आई देखील रोपणीच्या कामात वणगा यांना मदत करताना दिसून आल्या. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.