दिग्रस येथील माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या महिन्यापासून राजकीय वर्तुळात होत आहे. अखेर आता संजय देशमुख आज शिवबंधन हाती बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी शिवसेना नेते अरविंद सावंत गेल्या महिन्यात अकोल्यात आले असताना देशमुखांनी त्यांची गुप्त भेट घेतली होती. तेव्हापासूनच संजय देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा यवतमाळ जिल्ह्यात सुरु झाली होती, अखेर आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दिग्रस मतदारसंघाच्या राजकारणात दोन ‘संजय’ महत्वाचे ठरले आहेत. संजय देशमुख यांना मात देऊन सध्या संजय राठोड यांचे मतदारसंघात वर्चस्व आहे. मुळात दोघेही शिवसेनेतूनच पुढे आले आहे. दोघेही जिल्हाप्रमुख होते. मात्र पक्षाने संजय राठोड यांना झुकते माप दिल्यानंतर संजय देशमुख अपक्ष लढले.
आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने दिग्रस मतदारसंघात त्यांना मात देण्यासाठी पुन्हा संजय देशमुख यांना पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्लॅन आहे. अकोला येथे खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत भेट घेण्यापूर्वी मुंबईला त्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
त्यामुळे देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा एक महिन्यापासून सुरू आहे. अखेर आज ते शिवसेनेत प्रवेश करणार निश्चित झाले, त्यामुळे चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. संजय देशमुख यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, त्यांनी १९९९ ते २००९ असे १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.
विशेष म्हणजे दोन्ही वेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, २००९ मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात मागे पडले. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद दाखवली आहे.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढून ७५ हजार मतदान घेतलं होतं. संजय देशमुखांच्या याच ताकदीला आता बळ देण्याचा विचार ठाकरेंनी केला आहे. मात्र, आता संजय देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसेल असे बोलले जात आहे.