मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी भाजप देखील ताकदीने मैदानात उतरली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक विधान केले आहे.
भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणतात, ‘तुम्ही कितीही कारनामे करा. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र येऊ द्यात. आम्ही मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली उतरू देणार नाही. ही निवडणूक जिंकूच असा गर्भित इशारा राऊत यांनी दिला आहे. ते याबाबत पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई पालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा दावा राऊत यावेळी केला. त्यामुळे आता खरी सुरुवात झाली असून राऊतांच्या विधानावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, विरोधकांना लक्ष करताना राऊत म्हणाले, ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत. पवार यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम पुढे जाऊ शकत नाही. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय नाही. त्यांच्याशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही.’
तर दुसरीकडे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर गाठीभेटींना वेग आला आहे. याबाबत सांगताना राऊत म्हणाले, अनेक गाठीभेटी होत असतात. आमच्याकडे अनेक लोक येतात. अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी यावर भाष्य करणं टाळले.