दसरा मेळाव्यावरून चांगलच राजकारण तापलं आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. मात्र, आता शिवसेनेचे दोन गट पडल्याने यावर्षीचा दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत दोन्ही गटाकडून आम्हीच दसरा मेळावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्यावरून राजकारण देखील रंगलं आहे. सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात दावे – प्रतिदावे सुरू आहेत. मंगळवारी दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर चर्चा करण्यासाठी शिंदे गटाची बैठक पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे निश्चित झाल असल्याचं बोललं जातं आहे. याच वरून आता युवासेना आक्रमक झाली आहे. युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळींनी शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना शरद कोळींनी म्हंटलं आहे की, ‘समजा या चाळीस गद्दारांनी कायदा आणि सत्तेचा गैरवापर करुन शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ, फावडे घेऊन शिवसैनिक शिवतीर्थ मैदान उखडून टाकतील, असा इशाराच कोळींनी शिंदे गटाला दिला आहे.
दरम्यान, ‘शिवसैनिकांनी आजतागायत खूप सहन केले. पण, आता सहन करणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत, असा जणू इशारा कोळी यांनी शिंदे गटाला दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची थोबाडे फोडू, अशी आक्रमक भूमिका कोळी यांनी घेतली.
सध्या कोळी यांच्या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र यावर अद्याप शिंदे गटातून प्रतिक्रिया आलेली नाहीये. सध्या दसरा मेळावा चांगलाच चर्चेत आला आहे. दसरा मेळाव्यावरून आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सध्या सुरू आहे. दसरा मेळाव्याबद्दल अद्याप ठोक निर्णय झालेला नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या