सध्या शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाल्यापासून त्यांच्या हालचालींकडे सर्व राजकीय पक्षांच्या नजरा लागून आहेत. शिवसेना – संभाजी ब्रिगेड युतीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यांची ही युती किती यशस्वी होणार ते येणारा काळच ठरवेल.
मात्र, आता शिवसेना – संभाजी ब्रिगेड यांच्या युतीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर फेरबदल करण्यात आला आहे. २०२४ च्या निवडणुकीचे लक्ष्य समोर ठेवून मराठा सेवा संघाने नवी रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे.
मराठा सेवा संघाची जबाबदारी आता तरुण कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे. केवळ ३० टक्के जुने पदाधिकारी पदावर ठेवण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संभाजी ब्रिगेडशी झालेली युती निश्चितच राज्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरेल.
एकीकडे राज्यात शिवसेनेला खिंडार पडलेले असतानाच शिवसेना व संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षात उमटली आहे. महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे.
संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे की, या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल.
दरम्यान, नुकतीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. २६ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत, त्यांनी शिवसेनेसोबत युतीची घोषणा केली होती.