शिवसेना..नाते पिढ्यांपिढ्यांचे..; ठाकरेंच्या भाषणावेळी चिमुकल्याच्या जोरदार घोषणा; पहा व्हिडीओ

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांसह भाजपसोबत युती केली, आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली.

शिवसेनेच्या अनेक आमदारांसह शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात जात आहेत. राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले असून, त्यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून वाद प्रतिवाद सुरू आहेत. राज्यात सुरू असणाऱ्या या गोंधळादरम्यान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अरविंद सावंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कोणत्या राजकीय नेत्याचा नसून एका बाल शिवसैनिकाचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याची प्रचंड चर्चा होत आहे.

अरविंद सावंत यांनी व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, त्यात लिहिले आहे शिवसेना..नाते जिव्हाळ्याचे, स्नेहाचे..पिढ्यापिढ्यांचे! या व्हिडिओत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंचं हे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. मात्र, या गर्दीत एक बाल शिवसैनिक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. वडिलांच्या खांद्यावर हा मुलगा बसला असून, ठाकरेंच्या भाषणावर जोरजोरात टाळ्या वाजवताना जयजयकार करताना दिसत आहे.

सावंतांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केला आहे. सोबतच त्यांनी आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेच्या ट्विटर अकाउंटलाही हा व्हिडीओ टॅग केला आहे. सर्व शिवसैनिकांचे लक्ष सध्या या व्हिडीओ वरती आहे. अनेकांनी या बाल शिवसैनिकाचे कौतूक केलं आहे.

दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरेंचे कट्टर समर्थक यांनी शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी संवाद यात्रा सुरू केली आहे. आदित्य ठाकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यांना शिवसैनिकांची प्रचंड साथ मिळत आहे.