बंजारा समाजाचे नेते व मंत्री संजय राठोड यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पोहरादेवी गडाचे तीन महंत व पन्नास ते साठ टक्के बंजारा समाज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे.
पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहरादेवी गडाचे तीन महंत व पन्नास ते साठ टक्के बंजारा समाज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील महाराज यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
वेळोवेळी संजय राठोडांची पाठराखण करणाऱ्या महंतांपैकी तीन जण शिवबंधन बांधणार आहेत व त्यांच्या सोबत समाजातील अनेक नेते आणि पन्नास ते साठ टक्के बंजारा बांधवही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या माहिती सुनील महाराज यांनी दिली आहे.
सुनील महाराज हे पोहरादेवी गडाच्या पाच ते सहा प्रमुख महंतांपैकी ते एक आहेत. संत सेवालाल महाराजांचे वंशज म्हणून परिचित आहेत. बंजारा समाजात मोठा मान त्यांना आहे. त्यांनी याआधीही अनेक वेळा राजकीय विधानं केली आहेत. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
पोहरादेवी हे बंजारा समाजाचे सर्वात मोठे शक्तीपीठ आहे. या गडाच्या महंतांचा आदेश बंजारा बांधव शिरसावंद्य मानतात. त्यामुळे मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पूजा चव्हाण प्रकरणात पाय उतार व्हावे लागले.
त्यांनंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यानंतर राठोडांनी याच पोहरादेवी येथे मोठं शक्ती प्रदर्शन केलं. याच गडाच्या महंतांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दबाव आणून मागणी केली होती.