एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांनी बंड केलं. शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजप सोबत हातमिळवणी केली, आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार देखील बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.
माहितीनुसार, शिवसेनेच्या काही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतली आहे. शिवसेनेचे एकूण ११ खासदार अमित शहा यांच्या कृष्णा मेनन या निवासस्थानात भेटीसाठी गेले होते. त्यामुळे आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या कृष्णा मेनन या निवासस्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे. तर या निवासस्थानाला एक मागच्या बाजूला प्रवेशद्वार देखील आहे. तसेच एक मधले प्रवेशद्वार देखील आहे. याच मागच्या प्रवेशद्वारातून शिवसेनेचे एकूण ११ खासदार गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माहितीनुसार , खासदार आणि अमित शहा यांच्या या भेटीत कोणत्या खासदारांनी कोणत्या मुद्यांवर कधी आणि कसं पत्र द्यायचं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कसं कोंडीत पकडायचे यासंदर्भातील चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार का अशी चर्चा सुरू आहे.
अमित शाह यांच्याकडे ११ खासदारांना घेऊन जाणारा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास समजला जातो. त्यामुळे सदर शिवसेनेचा तरुण आणि उच्चशिक्षित खासदार कोण प्रश्न उपस्थित झाला आहे. माहितीनुसार, या खासदारानेच १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यासाठी व्यूहरचना केली आहे.
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून देखील खासदारांची बैठक मातोश्रीवर आयोजित केली होती. यात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे. शिवसेनेने राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी पाठिंबा दिला आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.