सध्या एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये दिवसेंदिवस संघर्ष वाढत चालला आहे. शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर आता १२ खासदारांनी देखील तोच मार्ग निवडला आहे. या खासदारांनी नुकतेच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिलं आहे.
त्यानंतर, आता शिंदे समर्थक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. नुकेतच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना हेमंत पाटील म्हणाले, विनायक राऊत यांनी कशापद्धतीने पक्ष संघटनेत पदं देत असताना, निवडणुकीवेळी तिकिटांचं वाटप करताना पैसे उकळले, त्याची पुराव्यासहित माझ्याकडे माहिती आहे. असा आरोप पाटील यांनी केला.
तसेच म्हणाले, आमदार संतोष बांगर जिल्हाप्रमुख होते. तेव्हा विनायक राऊत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी, जेवणावळीसाठी बांगर यांच्याकडून पैसे घेतले. सोन्याच्या चेन घेतल्या. लोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पैसे उकळले.
दरम्यान, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी देखील खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. आम्ही १५ ते २० लाख लोकांमधून निवडून येतो. त्यांना आम्ही बांधिल आहोत. त्यांची कामं झाली नाहीत तर आम्हाला त्यांना उत्तरं द्यावी लागतात, असे प्रतापराव जाधव म्हणाले.
तसेच म्हणाले, संजय राऊत सतत टीका करत असतात. त्यांनी एकदा निवडून येऊन दाखवावं. लवकरच मुंबईत महानगरपालिकेची निवडणूक आहे. राऊत यांनी कोणत्याही प्रभागातून निवडणूक लढवावी आणि नगरसेवक होऊन दाखवावं, असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.