शिवसेना भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना राष्ट्रवादी मात्र मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं आहे. तर दुसरीकडे या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि गृहखात्याला कानपिचक्या दिल्या आहेत.
‘तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल,’ असा गर्भित इशारा राऊत यांनी दिला आहे.
तसेच पुढे बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “देशातील जनतेला राज्यकर्ते नेहमीच एप्रिल फूल करत असतात. पाच राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोलचे भाव वाढवत एप्रिल फूल केलं. जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत वर्षानुवर्ष एप्रिल फूल सुरु आहे, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, ‘सरकार, राजकारण्याने जनतेशी बांधिलता ठेवली पाहिजे. फसवाफसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. अच्छे दिन येणार, दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार, खात्यात १५ लाख येणार, पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार हे एप्रिल फूलच असल्याचे राऊत यांनी म्हंटले.
तर दुसरीकडे आघाडीत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. मीडिया कधी काय बातम्या चालवेल याचा नेम नाही. राज्यातील कोणताही मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असे म्हणत आघाडीत सर्व काही अलबेल असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.