महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत युती केली, आणि राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. त्यामुळे आता शिंदे गटात दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. एक गट उद्धव ठाकरे आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा गट असे दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अनेक शिवसैनिक मातोश्री वरती येत आहेत. असे असताना एक धक्कादायक घटना मातोश्रीबाहेर घडली आहे, त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
ही धक्कादायक बातमी म्हणजे, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर निधन झाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना ते आपल्या गाडीतून घेऊन मातोश्रीवर आले होते. मात्र त्यांची तब्येत आधीपासूनच चांगली नसल्याचे बोलले जात आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरू असतानाच अस्वस्थ वाटत होते.
त्यांची तब्येत अधिक खराब झाल्याने त्यांना कलानगर येथील रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आलं, मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जाग्यावरच मृत पावले. या घटनेमुळे मातोश्रीबाहेर मोठी गर्दी जमली होती. उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अधिक सक्रिय झाले आहेत. त्यांनी नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील नियोजन उद्धव ठाकरे नव्या जोमात करताना दिसत आहेत. यामुळे अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जात आहेत.