गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती, तर २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. याविरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
रात्रीच्या राड्यानंतर आज सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात शिवसेनेनेच बडे नेते एकापाठोपाठ एक दाखल होताना दिसत आहेत. शिवसैनिकांवरील अटकेच्या कारवाईविरोधात जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सर्वप्रथम दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
त्यानंतर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि अंबादास दानवे हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांच्या तक्रारीवरुन आमच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करतात. मग आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून सदा सरवणकर यांना पोलीस अटक का करत नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.
एवढेच नाही तर, जोपर्यंत सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या दादर पोलीस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा रंगला आहे.
शिवसैनिक महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. पण पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही, असा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. सदा सरवणकर यांच्या विरोधात संपूर्ण ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.