पनवेलमध्ये काल भाजप प्रदेश कार्यकारीणीची बैठक झाली. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाषण केले. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याची खदखद बोलून दाखवली. यावर आता एकनाथ शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहेत.
चंद्रकांत पाटील भाषणात म्हणाले, मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो. कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. त्यांच्या या विधानामुळे आता भाजप-शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस बाहेर पडायला लागली आहे.
शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर दिलं आहे. गोगावले म्हणाले, चंद्रकांत दादा त्यांच्या बैठकीत काय बोलले, हे माहित नाही. पण आम्ही ४०-५० आमदार सत्ता सोडून आलो ते असेच आलो आहोत का? असा सवाल केला.
तसेच म्हणाले, आम्ही सत्ता सोडली नसती तर मग आमची युती झाली असती का? चंद्रकांतदादांचे जे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी तो योग्य निर्णय घेतला आहे. चंद्रकांतदादा बोलतात त्याप्रमाणे आम्ही पण तोच त्याग केला आहे. आम्ही पण आमच्या छातीवर किती दगड ठेवलं ते आम्हालाच माहित आहे.
गोगावले म्हणाले, चालू सत्तेतून पायउतार होऊन आम्ही आलो आहे. चंद्रकांतदादा बोलले असले तरी त्याचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, आम्ही जे सांगतो ते योग्य आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वादग्रस्त भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या भाषणाचे व्हिडीओ डिलीट करण्याचे आदेश हे केंद्र पातळीवरून देण्यात आले होते. मात्र, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन आता भाजप आणि शिंदे गट यांच्यातील अंतर्गत धुसफूस वाढण्यास सुरुवात झाली असे म्हणता येईल.