दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यावरुन चढाओढ लागली आहे, वेगवेगळ्या कल्पना दोन्ही गटातील लोक राबवत आहेत.
नुकतेच शिंदे गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरला. आता त्यानंतर शिंदे गटाने थेट उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर केल्याचं समोर येत आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर लाँच केला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरेचा आवाज वापरत शिंदे गटाने नवी खेळी केली आहे.
या दुसऱ्या टीझरमध्ये उद्धव ठाकरेंना त्यांच्या जुन्या भाषणाची आठवण करून देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणांचे छोटे-छोटे क्लिप या टीझरमध्ये वापरण्यात आले आहेत. या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या टीझरमधील भाषणात शरद पवार, सोनिया गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. यावरून निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही असा टोला शिंदे गटाने ठाकरेंना या टीझरमधून लगावला आहे. एवढेच नाही तर, ‘विसर ना व्हावा अशी टॅग लाईन.. निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही… ‘अशी या टीझरची कॅच लाईन शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गटाने पहिल्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटा आणि त्यांचाच आवाज वापरला. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असे म्हणत या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून आमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच शिंदे गटाने जाहीर केलेले दोन पोस्टर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आणि बाळासाहेब तुमचा वाघ, म्हणून हिंदूत्वाला जाग’ अशा प्रकारचे दोन पोस्टर शिंदे गटाकडून मुंबईत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.