शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी समृद्धी महामार्गावरून जात असणाऱ्या ताफ्यातील वाहनांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला असून, या अपघातात १५ ते १६ वाहनांचा चुराडा झाला आहे.
सध्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात खरी शिवसेना कोणाची आणि खऱ्या शिवसेनेची ताकद कोणामागे आहे हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी चढाओढ सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी तयारी सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. आपल्याच मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमावी यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, याच दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावरून त्यांचा ताफा जात होता. मात्र दौलताबादजवळ आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला.
माहितीनुसार, या अपघातात १५ते १६ वाहनांचा चुरडा झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान,शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मेळाव्यात येण्यासाठी खास समृद्धी महामार्ग खुला करण्यात आला आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसी येथे पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून ३० हजारांहून अधिक बस येणार असल्याची चर्चा आहे. या बस उभ्या करण्यासाठी बीकेसीलगत असलेली मुंबई विद्यापीठाची जागा निश्चित करण्यात आली आहे.