sandeepan bhumare : नुकतेच शिवसेनेचे दोन दसरे मेळावे पार पडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमधील शिवतीर्थावर पार पडला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा मुंबईतील बीकेसीवर पार पडला. मेळावे पार पडल्यानंतर कोणाच्या मेळाव्याला किती गर्दी? यावरून देखील राजकारण रंगलं.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच शेकडो लोकांनी बीकेसीचे मैदान सोडल्याचा दावा केला जात आहे. शिंदे यांचे भाषण सुरु असताना लोक उठून जात असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. शिंदे यांचं भाषण सुरू होईपर्यंत ६० टक्के लोक निघून गेल्याचा आरोप केला जात आहे.
यावरून आता शिंदे गटातील नेते आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना भुमरे यांनी म्हंटलं आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या मेळाव्यातून लोक निघून गेल्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचं भूमरे यांनी सांगितलं.
पुढे बोलताना भूमरे म्हणाले की, ‘सात ते आठ तास एकाच ठिकाणी बसल्यानंतर ते परत जागेवर येऊन बसले. हे असं चालूच असतं. मात्र, उठून जायचा काही संबंध नाही. उठून जायचं होतं, तर मग आलेच कशाला? ते इतक्या लांबून शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठीच आले होते.”
दरम्यान, “नऊ वाजता शिंदेंची सभा सुरू झाली. दुपारपासून शिंदे समर्थक सभेसाठी खुर्च्यांवर बसलेली होती. इतका मोठा जनसमुदाय होता की कोणी उठून जायचा संबंध नव्हता. मैदानात जितके लोक होते, तितकेच लोक मैदानाबाहेर होते,” असं देखील भुमरे यांनी म्हंटलं आहे.
तसेच याच प्रकारावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही चुकीचे काम केले असते तर एवढी लोकं समर्थनाला आली असती का? अशी विचारणा करत, इतकच नाही तर बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमली होती, असा दावा शिंदेंनी यावेळी केला.