Share

Shinde group : दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट अ‍ॅक्शन मोडवर; केली ‘ही’ मोठी प्लॅनिंग

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळेल याबाबत शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू होते. त्यावर नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे, दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मिळणार हे स्पष्ट झाले.

मात्र, आता दसरा मेळाव्याला आवाज कुणाचा जास्त, तसेच खरी शिवसेना कोणाची, हे दाखवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही गट त्यासाठी कामाला लागले आहेत.

शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदान अशा दोन्ही ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी जमवत त्यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाने या पार्श्वभूमीवर नियोजन सुरू केलं आहे.

यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. आमदार सुहास कांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहरातून ३००-३५० बसेस भरून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. त्याचसोबत मनमाड येथून २ रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत.

शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान मिळाले नसले, तरी बीकेसी एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. हे मैदानदेखील शिवाजी पार्क एवढेच मोठे आणि भव्य आहे. राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते जमतील, अशा प्रकारची तयारी शिंदे गटाकडून केली जात आहे.

सत्ता स्थापन झाल्यानंतर आपली पुढची राजकीय भूमिका, दिशा आणि विचार मांडण्यासाठी शिंदे गट तयार आहे. मेळाव्याच्या निमित्ताने दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर एखादी अतिमहत्त्वाची व्यक्ती आणून मेळाव्याची धार वाढविण्यासाठीही शिंदे गट कामाला लागल्याचे समजते.

खरी शिवसेना कोणाची याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला, तरी आमच्या मेळाव्याला जमणारी गर्दी हीच आमची शिवसेना आणि तीच खरी शिवसेना, असा संदेश या मेळाव्याच्या निमित्ताने देण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या संधीचे सोने करण्यासाठी दोन्ही गटांनी राज्यभरातील शिवसैनिक मेळाव्याच्या निमित्ताने कसे मुंबईत येतील, यासाठी नियोजन सुरू केले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now