Share

शिंदे- फडणविसांच्या जोडीला मिळणार १२ मंत्री; ‘या’ तारखेच्या रात्री ६ वाजता होणार शपथविधी

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या शुक्रवारी होणार असल्याचं समजत असून, त्यामुळे राज्याला आणखी बारा मंत्री मिळण्याची आशा आहे. राजभवनात त्या अनुशंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे.

माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात भाजपचे सात आणि शिंदे गटातील पाच अशा १२ मंत्र्यांना सामावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोण शपथ घेणार, याची उत्सुकता सत्ताधारी पक्षांच्या आमदारांत आहेत.

या ठरलेल्या मुहूर्तावर शपथविधी झाल्यास मंत्र्यांविना सरकारच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात भाजप आणि बंडखोर गटाचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना झाला तरी मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही.

शिवसेना आणि बंडखोरांमधील वादासंदर्भात न्यायालयाच्या निकालामुळे मंत्रीमंडळ विस्तार करण्यात अडचणी असल्याचे बोलले गेले. लवकरच विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. तरीही, एवढ्या दिवसांत ते शक्य झाले नाही.

सध्या, बंडखोर सोळा आमदारांची अपात्रता, शिवसेनेच्या चिन्हाचा वाद हा न्यायालयीन प्रक्रियेत असून त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही. आज म्हणजेच गुरूवारी सकाळी लवकर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा पाच ऑगस्टचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सांगण्यात येत आहे. त्यामुळे याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाकडून रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात लेखी मुद्दे सादर केले. सुप्रीम कोर्टात काल सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातल्या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी झाली. सर्वांचं म्हणणं ऐकल्यानंतर यावरील सुनावणी आज घेणार असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now