राज्यांत सत्तांतर झाल्यापासून राजकीय पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतः च्या सोयीनुसार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत. सध्या पक्षांतराचे प्रमाण वाढलं आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
अशोक गावडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. त्यानंतर नवी मुंबईतील हे खिंडार बुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लगेच हालचाली सुरू केल्या. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सलूजा सुतार यांची राष्ट्रवादीने नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली.
अशोक गावडे यांनी शिंदे गटात जाऊन अवघे दहा दिवस पण होत नाही, तोवरच नवी मुंबईतील ही खिंडार भरून काढण्यासाठी शरद पवारांनी नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी सलूजा सुतार यांची निवड केली. सलूजा सुतार यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता उत्साहाचे वातावरण आहे.
आज २७ सप्टेंबर रोजी सलूजा सुतार यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण या नियुक्त पत्र देणार आहेत. सलूजा सुतार ह्या अनुभवी व अभ्यासू लोकप्रतिनिधी असून त्यांचे त्यांच्या प्रभागासह संपूर्ण नवी मुंबईमध्ये लक्ष असल्याचं बोललं जातं.
दरम्यान, अशोक गावडे हे गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई बाहेरील नेत्यांच्या हस्तक्षेपमुळे नाराज होते. त्यांनी अधूनमधून आपली नाराजी उघडपणे मांडली देखील होती, मात्र नेते मंडळींनी दुर्लक्ष केल्यामुळे मला पक्ष सोडावा लागत आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
१६ सप्टेंबरला अशोक गावडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या समवेत त्यांच्या कन्या आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडे यांनीही शिंदे गटाचे सदस्यत्व स्वीकारले. यामुळे आधीच नवी मुंबईत रसातळाला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट झाल्याची चर्चा होती.