नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. भाजपचे यश पाहून आता विविध पक्ष येणाऱ्या निवडणुकीसाठी आपली रणनीती बनवत आहेत. यातच काल दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवडावे हा प्रस्ताव मांडला.
या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी शरद पवार यांची संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. जो एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी, मेहबूब शेख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील अनुभवी संसदीय नेत्यांपैकी एक आहेत.
तसेच म्हणाले, संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आज देशातील सर्व बिगरभाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्यात शरद पवार मोठी भूमिका बजावू शकतात.
मेहबूब शेख यांनीच या बैठकीत शरद पवार यांनी यूपीएचं अध्यक्ष व्हावं असा प्रस्ताव मांडला आणि बैठकीला उपस्थित नेत्यांनी देखील यास सर्वानुमते होकार दिला. या ठरावावर आता शरद पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची मागणी होत आहे. आता काँग्रेसचे मित्रपक्षही संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता राष्ट्रवादीने मांडलेल्या ठरावावर काँग्रेस पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहायचे आहे.